Home / Marathi / टेलिमेडिसीन आणि ई-आरोग्य

टेलिमेडिसीन आणि ई-आरोग्य

chandrashekhar-sathaye

मंजुऴेचा 3 वेऴा गर्भ राहूनही प्रत्येक वेऴा चौथ्या पाचव्या महिन्यात गर्भपात झाला होता. तिचा रक्तदाबही अनेक गोऴ्या खाऊनही कमी होत नव्हता. जिल्हा सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांना निदान होत नव्हते. तिची मुंबईला जाऊन विशेषज्ञांना दाखवण्यासारखी आर्थिक परिस्थिती नव्हती.जिल्हा सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी रुग्णालयात नव्यानेच सुरू झालेल्या टेलिमेडिसीन सुविधेचा उपयोग करून तिला मुंबईतील विशेषज्ञांना “दाखवले”. त्यातून तिला ‘ताकायासू आर्टेरायटिस’हा दुर्मिऴ आजार असल्याचे निदान झाले. त्याची विशिष्ट उपाययोजना करून आता तिचा रक्तदाब आता गोऴ्या न खाता आटोक्यात आहे आणि ती आता माताही झाली आहे.

टेलिमेडिसीन म्हणजे आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना समाजाला आरोग्यसेवा देणे. यात रुग्ण आणि डॉक्टर भौगोलिकदृष्टया एकाच ठिकाणी असणे आवश्यक किंबहुना अपेक्षितही नाही. रुग्णास तपासून त्याच्या निदानापर्यंत पोहोचेपर्यंत रुग्णाची जी माहिती डॉक्टरपर्यंत पोहोचणे अपेक्षित असते त्या माहितीचे वहन रुग्णाकडून डॉक्टरपर्यंत आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाते. यात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णाशी संवाद साधला जातो. ई स्टेथोस्कोपद्वारे रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसाचे कार्य ऐकण्याची सोय आहे. रुग्णाचे एक्स रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी एम् आर् आय् PACS या सॉफ्टवेअरने पाठवता येतात. इतकेच काय, रुग्णाचे ईसीजी, ईको, अंजिओग्राफी प्रत्यक्ष करतांना (REAL TIME) पाठवण्याची सोय आहे. यामुऴे विशेषज्ञ ते तत्काळ पाहून काय उपाययोजना करायची याविषयी मार्गदर्शन करू शकतात. यापुढचे पाऊल म्हणजे सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये न जाता घरात कम्प्यूटरसमोर बसून ऑपरेशन थिएटरमधील रोबोला आज्ञा देऊन ऑपरेशनकरू शकतात.

याचा सर्वाधिक उपयोग रुग्णांना होत आहे. विशेषज्ञ – स्पेशालीस्ट डॉक्टर खेड्यापाड्यात उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पारंपारिक आरोग्यसेवा पद्धतीत खेड्यातील रुग्ण प्रथम जवऴच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा फॅमिली डॉक्टरला दाखवणार – त्याच्या उपचारांनी फरक न पडल्यास तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी नेणार – व त्यानंतर मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये जाणार. यात पैशांची सोय न झाल्याने वा सोबतीला कोणी नसल्याने बराच उशीर होतो. त्यामुऴे रोग बऴावून कधीकधी परिस्थिती हाताबाबेर जाते. टेलिमेडिसीनमुऴे ही परिस्थिती सुधारेल व रोगाचे वेऴीच निदान होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

टेलिमेडिसीनचा दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे फॉलो अप किंवा फेरतपासणीकरिता. कॅन्सरसारख्या आजारांच्या शस्त्रक्रिया किंवा हृदयरोगावरील शस्त्रक्रियांकरिता मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये जाणे आवश्यक आहे, कारण या सुविधा अजून खेड्यांमध्ये उपलब्ध नाहीत. पण त्यानंतर वर्ष – दोन वर्षफेरतपासणीकरिता वारंवार मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये जावे लागते ते टेलिमेडिसीनव्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करता येते. यामुऴे वेऴ व पैशांची बचत तर होतेच शिवाय रुग्ण आणि नातेवाईकांना होणारा मनस्तापही कमी होतो.

कधीकधी एखादी यंत्रसामुग्री (उदा सीटी स्कॅनर) एखाद्या छोट्या गावात (उदा वडखऴ) आपण बसवू शकतो तीयंत्रसामुग्री वापरून स्कॅन करणारा माणूस (टेक्नीशियन) तेथे नियुक्त करता येतो. (शरीराच्या विविध भागांचे सीटी स्कॅन करण्याच्या ठराविक पध्दती आहेत त्यामुऴे थोडेसे प्रशिक्षण आणि अनुभव घेऊन साधारण शिक्षण झालेला माणूस ते करू शकतो.) पण त्याचे विश्लेषण (reporting) करणारा अनुभवी विशेषज्ञ (radiologist) त्या छोट्या गावात उपलब्ध असणे अवघड असते. या कारणामुऴे अशी यंत्रसामुग्री पूर्वी छोट्या गावात बसवण्यास लोक उत्सुक नसत. टेलिमेडिसीनमुऴे हा अडथऴा आता पार झाला आहे. अनुभवी विशेषज्ञ (radiologist) मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये (किंवा ब-यातदा स्वतःच्या घरामध्ये – किंवा सुटीवर हॉटेलमध्ये – विमानतऴावर – बसलेले असतांनादेखील)त्याचे विश्लेषण (reporting) करून देऊ शकतात. ही किमया साध्य झाली आहे चित्रे (इमेजेस) पाठवण्याच्या तंत्रज्ञानामुऴे आणि मोबाईल इंटरनेटमधील थ्री जी फोर जी क्रांतीमुऴे. यामुऴे वडखऴसारख्या छोट्या गावातसीटी स्कॅनर आले आहेत आणि अनुभवी विशेषज्ञ (radiologist)ही आनंदात आहेत कारण त्यांना ‘कामावर’ जाण्याची आवश्यकताच उरलेली नाही.टेलिरेडिऑलॉजीप्रमाणे टेलिपॅथॉलॉजीची शाखाही विस्तारू लागली आहे. कॅन्सरचे निदान करण्यासाठी विशिष्ट अनुभवी पॅथॉलॉजिस्टचे मत घेणे सोपे झाले आहे.

टेलिमेडिसीनचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे रुग्णाचे दूरस्थ नियंत्रण (remote monitoring) नागाव आक्षीसारख्या छोट्या गावांत अनेक निवृत्त वृद्ध मंडऴी आहेत. त्यापैकी ब-याच जणांना रक्तदाब हृदयरोग मधुमेह दमा असे आजार आहेत, ज्यांचे उपचार आयुष्यभरच घ्यावे लागतात. या आजारांचे वैशिष्ट्य म्हणजे यांमध्ये काही ठराविक गोष्टी (उदा रक्तदाब, रक्तशर्करा) रोजच्या रोज (किंवा कमीत कमी आठवड्यातून एकदातरी) मोजाव्या लागतात. याठराविक गोष्टी औषधांचे प्रमाण कमीजास्त करून नियंत्रणात ठेवाव्या लागतात.याठराविक गोष्टीनियंत्रणात ठेवल्या तर गंभीर आजारास सामोरे जावे लागत नाही.याठराविक गोष्टी घरच्या घरी मोजणारी यत्रे आता उपलब्ध आहेत. गुंतागंतीच्या हृदयरुग्णांकरिता चालता फिरतां शरीरास जोडलेल्या छोट्याशा चिपद्वारे दिवसाचे 24 तास ईसीजी रेकॉर्ड करण्याची सोय आहे. या वृद्ध मंडऴींना वारंवार डॉक्टरकडे जाणे शक्य नसते. आणि रोज जरी घरच्या घरी यंत्राद्वारा तपासणी झाली तरी त्याचे विशलेषण करून औषधयोजनेत बदल करण्याचा किंवा ईसीजी रेकॉर्डमध्ये गंभीर बदल आढऴल्यास रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला देण्याचा निर्णय डॉक्टरलाच घ्यावा लागणार. टेलिमेडिसीनद्वारा या तपासण्यांचे रेकॉर्ड रुग्णाकडून (रुग्ण घरीच असतांना) डॉक्टरकडे पाठवण्याची सुविधा मोबाईल थ्रीजी इंटरनेटमुऴे अल्प खर्चात उपलब्ध झाली आहे. यामुऴे छोट्या गावांत राहणा-या वृद्धांचे म्हातारपणीचे दीर्घ आजार घरच्या घरी नियंत्रणात ठेवणे व त्याची गंभीर गुंतागुंत टाऴणे शक्य झाले आहे.

ई-आरोग्य (e health) ही एक व्यापक संकल्पना आहे. बँकिंगमधील नेटबँकिंग असो वा करमणूकक्षेत्रातील व्हीडीओ ऑन डिमांड असो – माहिती तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रांना अधिकाधिक व्यक्तिसापेक्ष (user defineduser controlled) बनवले आहे. आरोग्यक्षेत्रही याला अपवाद नाही.भौगोलिक मर्यादांमुळे पूर्वी गावात उपलब्ध असलेल्या डॉक्टरकडे दाखवणे क्रमप्राप्त होते. इंटरनेटने भूगोलाला इतिहासजमा केले आहे. त्यामुऴे आता रेवदंड्याच्या हसनमियांची इच्छा आणि आर्थिक शक्ती असेल तर त्यांच्या गुडघेदुखीसाठी ते रेवदंड्यात बसून न्यूयॉर्कमधील डॉ राणावतांचा सल्ला घेऊ शकतात. काही दिवसांनी फ्रीज वॉशिंग मशीन बनवणा-या कंपन्या ज्याप्रमाणे मध्यवर्ती क़ॉल सेंटर बनवून सेवा देतात त्याप्रमाणे आरोग्य सेवा देणा-या कंपन्या (उदा अपोलो हॉस्पिटल)मध्यवर्ती क़ॉल सेंटर सुरू करतील. त्यांच्या पॅनेलवर काही आकस्मिक (emergency) सेवा देणारे डॉक्टर्स असतील तर काही केवऴ वेऴ ठरवून सेवा देणारे डॉक्टर्स असतील. काही केवऴ सेकंड ओपिनियन देणारे डॉक्टर्स असतील. जरी समजा हेमध्यवर्ती क़ॉल सेंटर मुंबईत असले तरी सेवा देणारे डॉक्टर्स मुंबई, पुणे, दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क अशा वेगवेगळ्या शहरांत राहणारे व तेथील नामांकित इस्पितळांत काम करणारे किंवा फ्रीलान्सर्स असू शकतील. प्रत्येक डॉक्टरची फी वेगवेगळी असू शकेल. काही डॉक्टर्स प्रति कन्सलटेशन चार्ज करतील तर काही प्रति मिनिट चार्ज करतील. आरोग्य सेवा देणा-या कंपन्या उपलब्ध डॉक्टर्स, त्यांची क्वालिफिकेशन्स, त्यांच्या उपलब्धतेच्या वेळा, त्यांच्या उपलब्ध सेवा, त्यांचीफी चार्ज करण्याची पद्धत यांविषयी सविस्तर माहिती त्यांच्या वेबसाईटवर देतील. ई-आरोग्य लाभार्थी रुग्ण अर्थातच बुद्धिमान असतील. बहुतेकवेळा त्यांनी आरोग्य सेवा देणा-या कंपन्याच्या वेबसाईट वाचून कोणत्या डॉक्टरला दाखवायचे हे ठरवले असेल. ते अपोलो हॉस्पिटलच्या मध्यवर्ती क़ॉल सेंटरला फोन करून स्वतःचा क्रेडिट कार्ड क्रमांक वा आरोग्य विमा कंपनीने दिलेला क्रमांक देऊन त्या डॉक्टरची वेळ (अपॉईंटमेंट) घेतील. आकस्मिक स्थितीत क़ॉल सेंटर एक्झीक्यूटिवव्ह त्यांना उपलब्ध डॉक्टरसोबत जोडून देतील. ठरलेल्या वेळी रुग्ण स्वतःच्या घरून किंवा घराजवळच्या टेलिमेडिसीन केंद्रातून त्याच्या इच्छित डॉक्टरशीव्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधू शकेल. रुग्णाचे संबंधित रेकॉर्ड्स आणि रिपोर्ट्स आरोग्य सेवा कंपनीने संबंधित डॉक्टरला आधीच ई-मेल केलेले असतील. जरूर भासल्यास रुग्णाच्या घरीअसलेल्या ई स्टेथोस्कोपद्वारे तो डॉक्टर त्या रुग्णास तपासू शकेल किंवा टेलिमेडिसीन केंद्रातील ईको मशीनवर तो डॉक्टरत्या रुग्णाचा डॉक्टरला हवा तसा ईकोकार्डिओग्राम काढून बघू शकेल. या सर्व माहितीच्या आधारे डॉक्टर उपाययोजना सुचवेल. रुग्णाच्या क्रेडिट कार्डमधून डॉक्टरची फी डॉक्टरला मिळेल. त्यातील काही हिस्सा आरोग्य सेवा देणारी कंपनी घेईल. डॉक्टरी उपाययोजनेतील औषधांचे ई-प्रिस्क्रिप्शन मध्यवर्ती ई-फार्मसीकडे ई-मेल केले जाईल. मध्यवर्ती ई-फार्मसी त्यां रुग्णाचा पत्ता बघून त्याच्या घराजवळच्या औषधदुकानात ती औषधे उपलब्ध आहेत का हे त्यांच्याकडील मध्यवर्ती डेटाबेसमध्ये तपासतील. ती औषधे घराजवळच्या औषधदुकानात उपलब्ध असतील तर रुग्णाच्या घरी “अर्ध्या तासात” (“डोमिनोच्या होम डिलिव्हरी पिझ्झा सारखी”) पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. औषधे घराजवळच्या औषधदुकानातउपलब्ध नसतील तर मध्यवर्ती फार्मसीमधून ती रुग्णास कुरिअर केली जातील. डॉक्टरी उपाययोजनेत शस्त्रक्रिया असेल तर अपोलो हॉस्पिटलचे मध्यवर्ती क़ॉल सेंटरएक्झीक्यूटिवव्ह रुग्णास विविध रुग्णालये व डॉक्टरांचे विकल्प देतील. रुग्ण त्यांमधून निवडून अथवा इतरत्र स्वतःच्या इच्छेप्रमाणे, ऐपतीप्रमाणे व त्याच्या आरोग्यविमा पॉलिसीच्या प्रतिपूर्ती धोरणाप्रमाणे शस्त्रक्रिया करून घेईल. केवळ शस्त्रक्रियेकरिता, आकस्मिक गंभीर आजारांकरिता, लसीकरणाकरिताआणिकधीकधी बाळंतपणाकरिता रुग्णाला प्रत्यक्ष डॉक्टरकडे जावे लागेल(– कधीकधी यासाठी म्हटले आहे की ब-याच जणी internet specialist supervised home delivery – घरीच बाळंतपण करून घेतील.) शत्रक्रियेनंतरचा बहुतांश फॉलो अप घरून किंवा घराजवळच्या टेलिमेडिसीन केंद्रातून होईल.

या सा-या भविष्यवेधी ई-आरोग्यातले अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. यातील खर्च व ही व्यवस्था केवळ श्रीमंतांपुरतीच मर्यादित राहील, की गरीबांनाही त्याचा फायदा होईल हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. माहिती वहनातील सुरक्षितता , अचूकता आणि जबाबदारी हे फार महत्त्वाचे प्रश्नआहेत.
या सा-या व्यक्तिकेंद्रित आरोग्यसेवेत सध्याच्या फॅमिली डॉक्टरचे स्थान काय राहील? हा मोठा प्रश्न आहे. मुख्यतः त्यांचे स्थान हे आरोग्य-मार्गदर्शक (health promotor) म्हणून राहील. आकस्मिक गंभीर आजारांकरिता पहिल्या टप्प्यातही त्यांचे स्थान राहील.

यूकेत NHS Direct नावाने सरकारी पाठबळाने ई-आरोग्य प्रकल्प सुरू झाला आहे. भारतात इस्रोतर्फे टेलिमेडिसीन सुविधा जोडणी अनेक ठिकाणी करण्यात आलेली आहे (त्यात सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयेही आहेत) ती अगदी प्राथमिक दर्जाची असली तरी सुरुवाततरी झालेली आहे. – आणि मुख्य म्हणजे गरीबांना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे.

सध्याच्या घडीला हे सारे दिवास्वप्न वाटले तरी भविष्यात कधीतरी हे घडणार आहे हे नक्की. हा बदल स्वीकारणे सुरुवातीला सर्वांनाच अवघड जाईल. कदाचित काही काळ त्यात अनिष्ट प्रवृत्ती वाढीस लागून त्रासही होईल. पण हळूहळू त्यातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळून हे ई-आरोग्य गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, बाल-वृद्ध, शहरातले-खेड्यातले, असे आरोग्यातले भेदाभेद दूर करून पृथ्वीवरील सर्वांना निरामय करेल असा मला विश्वास वाटतो.

(लेखक अस्थिरोगतज्ञ आहेत व ते अलिबाग येथे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात.)

About admin

Scroll To Top